आशा स्वयं सेविकांना आरोग्यवर्धिनी कामाचा थकीत मोबदला मिळावा ,रामकृष्ण पाटील

आशा स्वयं सेविका यांना आरोग्य वर्धिनी कामाचा मोबदला मिळावा

आशा स्वयंसेविकांना आरोग्यवर्धिनीच्या कामाचा थकित मोबदला अदा करावा   - रामकृष्ण पाटील          
          जळगाव जिल्ह्यातील बहुसंख्य प्राथमिक आरोग्य केंद्र HWC अंतर्गत आरोग्यवर्धिनी मध्ये परावर्तित करण्यात आली आहेत.आरोग्यवर्धिनीमध्ये परावर्तित केलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत काम करणाऱ्या आशा स्वयंसेविकांना एप्रिल २०२० पासून दरमहा १०००/- रुपये टिमबेसच्या कामाचा मोबदला अदा करण्यासंदर्भात मा.सहसंचालक (अतांत्रिक), राष्ट्रीय आरोग्य अभियान,मुंबई यांनी दि.०९ ऑक्टोबर २०२० रोजी आदेशित केले आहे.त्यानुसार जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिनांक १३.१०.२०२० रोजीच्या पत्रान्वये आशा स्वयंसेविकांना मोबदला देण्याबाबत सर्व तालुका आरोग्य अधिकारी यांना आदेशित केले आहे.               
             परंतु जिल्ह्यातील बहुसंख्य तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी आशा स्वयंसेविकांना HWC अंतर्गत वरील प्रमाणे एप्रिल २०२० पासून आजतागायत दरमहा १०००/- रुपये अदा केलेले नाहीत.परिणामी आशा स्वयंसेविकांमध्ये प्रचंड चीड निर्माण झालेली आहे.             
          आशा स्वयंसेविकांना सदर कामाचा थकीत मोबदला करून दरमहा लागू करण्यात यावा.याबाबत संघटनेने दिनांक २४.०८.२०२१ रोजी सर्व तालुका आरोग्य अधिकारी तसेच वरिष्ठ पातळीवर पत्र देऊन तसेच वेळोवेळी मागणी केलेली आहे.तरीही आशा स्वयंसेविकांना सदर थकीत मोबदला अदा केलेला नाही.    
            आशा स्वयंसेविकांना वरील थकित मोबदला येत्या पंधरा दिवसांत अदा न केल्यास आशा स्वयंसेविका त्या-त्या तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करतील.असा इशारा संघटनेचे आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांनी दिला आहे.